Tuesday, June 22, 2010

महाराणा प्रताप


(महाराणा प्रताप यांच्या चरित्राचे अभ्यासक विद्याधर पानट यांच्या लेखनीतून आणि महाराणा प्रताप म्हणजे श्रीशिवछत्रपतींचे स्फूर्तिस्थान या पुस्तकाचा संदर्भ घेउन हाती आलेली ही अल्पशी माहिती श्री चरनी अर्पण )

" माई एहड़ा पूत जण, जेहड़ा राण प्रताप।अकबर सूतो ओधकै, जाण सिराणै साप॥ "

महाराणा प्रताप यांचा जन्म इसवी सन १५४० मध्ये झाला. मेवाडचा राणा द्वितीय उदयसिंह यास ३३ अपत्ये होती. या सर्वांत मोठा प्रतापसिंह. स्वाभिमान व सदाचार हे प्रतापसिंहाचे मुख्य गुण होते. तो बालपणापासूनच धीट आणि शूर होता. त्याचे हे गुण पाहूनच मोठेपणी हा महापराक्रमी होणार याची सर्वांना कल्पना आली होती. शिक्षणापेक्षा मैदानी खेळ व शस्त्रास्त्रे चालवणे त्याला जास्त आवडत असे. महाराणा प्रतापसिंहांच्या काळात दिल्लीच्या सिंहासनावर मोगल बादशहा अकबराची सत्ता होती. तो हिंदूंच्या बळाचा वापर करून हिंदु राजांनाच गुलाम बनवत असे. अनेक रजपूत राजांनी तर मानसन्मानाच्या लालसेने आपल्या उज्ज्वल परपरांना व क्षात्रधर्माला तिलांजली देऊन आपल्या लेकी- सुनांनाही अकबराच्या अंत:पुरात पोहोचवले होते. उदयसिंहाने आपल्या मृत्यूपूर्वी धाकट्या पत्‍नीचा मुलगा जगमल्ल याला उत्तराधिकारी नेमले. प्रतापसिंह हा जगमल्लपेक्षा मोठा होता. प्रभु रामचंद्रांप्रमाणे पित्याची आज्ञा प्रमाण मानून सिंहासनाचा त्याग करून मेवाडपासून दूर निघून जाण्याची तयारी प्रतापसिंहाने दर्शवली. परंतु तेथील सरदारांना ही गोष्ट मुळीच योग्य वाटली नाही. कारण रजपूत घराण्यांमध्ये पित्यानंतर ज्येष्ठ राजपुत्रालाच सिंहासनावर बसवायचे अशी प्रथा होती. याशिवाय जगमल्ल हा प्रतापसिंहाप्रमाणे शूर, स्वाभिमानी व साहसी नव्हता. त्यामुळे प्रतापसिंहालाच सिंहासनावर बसवायचे आणि जगमल्लाला सिंहासनाचा त्याग करण्यास भाग पाडायचे, असे सर्वांनी मिळून ठरवले. सर्व सरदारांच्या व मेवाडजनांच्या प्रबळ आग्रहाला मान देऊन प्रतापसिंहाने राज्याभिषेक करवून घेतला.
मेवाडच्या चारही सीमा शत्रूंनी घेरल्या होत्या. महाराणा प्रतापचे सख्खे भाऊ शक्‍तिसिंह व जगमल्ल हे दोघेही अकबराला मिळाले होते. शत्रूशी समोरासमोर लढाई करण्यासाठी पुरेसे सुसज्ज सैन्य उभे करणे, ही पहिली समस्या होती आणि त्याकरिता अपार धनाची आवश्यकता होती; पण महाराणा प्रतापचा खजिना रिकामा होता. याउलट अकबराजवळ भरपूर सैन्य, अपार संपत्ति व मुबलक साधने होती. अशा अवघड प्रसंगीही महाराणा प्रताप विचलित वा निराश झाला नाही. अकबरापेक्षा आपण कमजोर आहोत, असे निराशेचे उद्‌गारदेखील त्याने कधी काढले नाहीत. आपली मातृभूमि मोगलांच्या गुलामीतून लवकरात लवकर कशी मुक्‍त होईल, असा एकच ध्यास प्रतापसिंहाला लागला होता. एक दिवस त्याने आपल्या विश्‍वासू सरदारांची सभा घेतली आणि धीरगंभीर व ओजस्वी वाणीने सर्व सरदारांना कळवळून आवाहन केले. तो म्हणाला की, ``शूर वीर रजपूत बांधवांनो ! आपली मातृभूमि, पुण्यभूमि मेवाड आजही मोगलांच्या ताब्यात आहे. आज मी आपणासमोर प्रतिज्ञा करतो की, चितोड स्वतंत्र होईपर्यंत मी सोन्याचांदीच्या ताटात जेवणार नाही. मऊ गादीवर झोपणार नाही, राजप्रासादात रहाणार नाही, याऐवजी मी पत्रावळीवर जेवेन, जमिनीवर झोपेन व झोपडीत वास्तव्य करेन आणि चितोड स्वतंत्र होईपर्यंत दाढीही करणार नाही. शूर सरदारांनो ! माझी ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरिता तन-मन-धनाने आपण सहकार्य द्याल, अशी आशा आहे.'' प्रतापसिंहाची कठोर प्रतिज्ञा ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व सरदारांच्या अंत:करणात उत्साहाची लहर उठली. एकमुखाने त्यांनी घोषणा केली की, ``हे प्रभो, आमच्या शरीरातील रक्‍ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही चितोडच्या मुक्‍तीसाठी राणा प्रतापसिंहाला साहाय्य करू व त्याच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन लढू ! आम्ही मरण पत्करू; पण आमच्या ध्येयापासून हटणार नाही. राणाजी, आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे आहोत, याची खात्री ठेवा. केवळ आपल्या इशार्‍याचाच अवकाश की, आम्ही आत्मसमर्पण करायला तयार आहोत.'' राणा प्रतापला आपला मांडलिक बनवण्याकरता अकबराने खूप प्रयत्‍न केले; पण ते व्यर्थ गेले. राणा प्रतापशी समझोता न होऊ शकल्यामुळे अकबराने चिडून युद्ध पुकारले. राणा प्रतापही युद्धाच्या तयारीला लागला. त्याने आपली राजधानी दुर्गम अशा अरवली पहाडात कुंभलगड येथे हलवली. प्रतापाने आपल्या सैन्यात वनवासी व भिल्ल लोकांचीही भरती केली. या लोकांनी आजवर कुठल्याही युद्धात भाग घेतलेला नव्हता. तरीपण राणा प्रतापने त्यांच्याकडून तयारी करवून घेतली. त्याचप्रमाणे सर्व रजपूत सरदारांना मेवाडचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता रजपूतांच्या ध्वजाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले.
राणा प्रतापचे २२ हजारचे सैन्य व अकबराचे २ लाखाचे सैन्य यांची हळदीघाट येथे समोरासमोर गाठ पडली. या युद्धात राणा प्रताप व त्याच्या सैन्याने खूप पराक्रम गाजवला. या युद्धात राणा प्रतापला माघार घ्यावी लागली, हे जरी खरे असले तरी अकबराचे सैन्य राणा प्रतापचा पूर्ण पाडाव करण्यात अयशस्वी ठरले. या युद्धात राणा प्रतापच्या बरोबरीने त्याचा प्रतापी, अत्यंत इमानी घोडा चेतकही अजरामर झाला. हळदीघाटच्या युद्धात चेतक खूप घायाळ झाला होता. तरीही त्याने आपल्या स्वामीचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एका बर्‍याच मोठ्या नाल्यावरून लांब उडी मारली. नाला पार करताच चेतक खाली पडला व गतप्राण झाला. अशा प्रकारे त्याने स्वत:चे प्राण धोक्यात घालून राणा प्रतापला वाचवले. चेतकच्या मृत्युमुळे वज्रहृदयी पोलादी महाराणाही बालकाप्रमाणे अश्रुपात करू लागला. ज्या स्थानी चेतकने आपले प्राण सोडले त्या ठिकाणी राणा प्रतापने एक सुंदरसे उद्यान निर्माण केले. यानंतर स्वत: अकबराने राणा प्रतापवर हल्ला केला. ६ महिने युद्ध चालू ठेवूनही अकबर महाराणा प्रतापचा पराभव करू शकला नाही. हात हलवत अकबर दिल्लीला परतला. शेवटचा प्रयत्‍न म्हणून अकबराने सन १५८४ मध्ये महापराक्रमी सेनापति जगन्नाथ याला विशाल सैन्य देऊन मेवाडवर पाठवले. २ वर्षे अथक परिश्रम करूनही महाराणा प्रतापला पकडणे त्यालाही जमले नाही. पर्वताच्या दर्‍याखोर्‍यात लपत छपत फिरत असतांना महाराणा प्रताप स्वत:चे कुटुंबही बरोबर नेत असे. शत्रु केव्हाही पाठलाग करील अशी त्या सर्वांना धास्ती असायची. जंगलात खाण्यापिण्याचे अतिशय हाल होत असत. अनेकदा त्यांना भुकेपायी व्याकूळ व्हावे लागे. अन्नपाण्याशिवाय व झोपेशिवाय त्यांना रात्रीबेरात्री पहाडातून व जंगलातून भटकावे लागे. शत्रु आला, अशी खबर मिळताक्षणीच कित्येक वेळा समोरच्या पानातले अन्नपाणी सोडून निघून जावे लागे. अशा एकामागून एक आपत्ती त्यांच्यावर कोसळत होत्या. एक दिवस महाराणी जंगलात भाकर्‍या भाजत होती. सगळयांनी आपापल्या हिश्श्याची भाकरी खाऊन घेतली. महाराणीने आपल्या मुलीला अर्धी भाकरी खाऊन उरलेली रात्रीसाठी बांधून ठेवण्यास सांगितले. इतक्यात एका जंगली मांजरीने मुलीच्या हातातील भाकरी झडप घालून पळवली. असाहाय्यपणे ती राजकन्या रडत बसली. भाकरीचा अर्धा तुकडाही तिच्या नशिबात नव्हता. हे दृश्य पाहून वज्रहृदयी महाराणा प्रतापही किंचितसा विचलित झाला. त्याला आपल्या साहसाची, धैर्याची, पराक्रमाची व स्वाभिमानाची मनस्वी चीड आली. हे सगळे व्यर्थ आहे कि काय, असे वाटू लागले. विवश मनाच्या दोलायमान अवस्थेतच त्याने अकबराशी तह करण्यास संमति दिली. अकबराच्या दरबारातील महाराणा प्रतापचा चाहता असलेला राजकवि पृथ्वीराज याने महाराणा प्रतापला राजस्थानी भाषेत कवितेच्या रूपात एक मोठे पत्र लिहिले व धीर दिला व तहाच्या विचारापासून परावृत्त केले. कवी पृथ्वीराजच्या या पत्राने महाराणा प्रतापला आणखी दहा सहस्र सैनिकांचे बळ प्राप्‍त झाल्यासारखे वाटले. त्याचे विचलित झालेले मन स्थिर झाले. अकबराला शरण जाण्याचा विचार त्याने मनातून झटकून टाकला. उलटपक्षी त्याने अधिक तीव्रतेने व दृढतेने सैन्यबळ गोळा केले व आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्‍नांत तो मग्न झाला.
भामाशाह नामक रजपूत सरदार महाराणा प्रतापच्या पूर्वजांच्या दरबारात मंत्री म्हणून होता. आपल्या स्वामीवर जंगलात भटकण्याची आपत्ति यावी, याची त्याच्या मनाला सतत टोचणी लागली होती. महाराणा प्रतापला अशा आपद्‌ग्रस्त स्थितीत पाहून भामाशाहाचे मन द्रवले. त्याने २५ हजार सैनिकांना १२ वर्षांपर्यंत सहजतेने पदरी ठेवू शकेल एवढी अमाप संपत्ति आपल्या स्वामीच्या चरणी अर्पण केली. राणा प्रतापाचा आनंद गगनात मावेनासा झाला. कृतज्ञतेने त्याचे अंत:करण भरून आले. सुरुवातीला प्रतापाने भामाशाहाच्या संपत्तीला विनम्र नकार दिला. परंतु भामाशाहाच्या मन:पूर्वक आग्रहाखातर त्या संपत्तीचा अखेर त्याने स्वीकार केला. भामाशाहाच्या संपत्तीनंतर महाराणा प्रतापकडे इतर अनेक ठिकाणांहून धन यावयास लागले. या सर्व धनाचा उपयोग करून त्याने आपल्या सैन्यात वाढ केली व संपूर्ण मेवाड प्रांत स्वतंत्र केला. पण अजूनही चितोड मोगलांच्याच ताब्यात होते. मरणासन्न अवस्थेतही महाराणा प्रताप गवताच्या शय्येवरच होता. अंतिम क्षणापर्यंत तो मऊ, मुलायम गादीवर झोपलाच नाही. कारण चितोड स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली नव्हती. अखेरच्या क्षणी आपला पुत्र अमरसिंहाचा हात हातात घेऊन त्याने आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे दायित्व त्याच्यावर सोपवले व शांतपणे आपले प्राण सोडले. अकबरासारख्या क्रूर बादशहाशी त्याने केलेल्या संघर्षाला इतिहासात तोड नाही. जवळजवळ संपूर्ण राजस्थान मोगल बादशहा अकबर याच्या ताब्यात गेले असतांना महाराणा प्रतापने आपला लहानसा भूप्रदेश बारा वर्षे लढवला. महाराणा प्रतापला नमवण्यासाठी बादशहाने पुष्कळ प्रयत्‍न केले; पण महाराणा प्रताप अखेरपर्यंत अजिंक्य राहिला. एवढेच नव्हे, तर त्याने मोगलांच्या तावडीतून राजस्थानचा बराचसा भूप्रदेश स्वतंत्रही केला. अपार कष्ट सोसून त्याने आपल्या कुळाला आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू दिला नाही. `स्वातंत्र्य' या शब्दाचा पर्यायच `महाराणा प्रतापसिंह' व्हावा इतके त्याचे जीवन तेजस्वी होते. त्याच्या वीरस्मृतीस आमचे अभिवादन !

No comments:

Post a Comment