Tuesday, June 29, 2010

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !!


छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला।

शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।
वरील दोन ओळींतच खर्‍या अर्थाने संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो.
संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर काळाच्या आघाताला सुरूवात झाली. सईबाईंच्या पश्र्चात राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. संभाजीराजांना कोणकोणते शिक्षण दिले गेले हे सभासद व चिटणीसांच्या बखरीतूनमोठ्या प्रमाणावर स्पष्ट होते.

‘‘संभाजीराजांनी विद्याभ्यास करावा, त्याला सुशिक्षित करावे म्हणून त्याला घोड्यावर बसविणे, शास्त्रविद्या, तालीम यांचे शिक्षण देवविले. अष्टप्रधान यात राजपुत्राची गणना आहे. सर्व आमात्य राजाचा वामभुज; युवराज, राजपुत्र हा सत्यभुज असे आहे. त्याअर्थी तो सुशिक्षित असावा म्हणून लेखनादि अभ्यास करविला. दंडनिती, राजधर्म हे सांगविले. राजपुत्र धर्म, पितृसेवा कायावाचामने करावी. पित्याने संतुष्ट होऊन युवराजपद कारभार सांगितला असा गर्वारुढ उत्पन्न होऊ नये. राजाचे कुळी अनीतिमान पुत्र निर्माण झाला म्हणजे ते राज्य व कुल शीघ्र क्षयास जाते. म्हणुन बहुत नीतिने रक्षिणे तसे रक्षिले. आणि मातबर सरकारकून प्रौढ यांच्यापाशी बसावे, दरबारात बसावे म्हणजे कारभार माहित होत जाईल.’’ अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रांत आढळते. अशा प्रकारे संभाजीराजांचे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण झाले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची अतिशय काटेकोर पद्धतीने जडणघडण होत गेली. याच दरम्यान त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांना खूप मोठा अनुभव मिळाला. हा अनुभव होता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीचा. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला. वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची, मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत, अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेशांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला. हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालविण्यासाठी खूप उपयोगी पडला. मिर्झाराजांकडे ओलीस राहणे, शाही फर्मान स्वीकारणे या गोष्टी देखील त्यांना दिशादर्शक ठरल्या. खूप लहान वयातच शत्रूचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना अनुभवता आली. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत संभाजी राजे पारंगत तर होतच होते. त्याबरोबरच त्यांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही प्रभुत्व होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथात दोन अध्याय असून पहिल्या अध्यायात ‘स्वकुल’ व ‘स्वकाव्य वर्णन’ या विषयीचे लेखन आढळते तर दुसर्‍या अध्यायात ‘राजनिती’ व ‘दुर्ग निरूपण’ या विषयीची सविस्तर माहिती संभाजी महाराजांनी लिहिलेली आढळते.

शिवराज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले. पण खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच संभाजीमहाराज लोकांना कळाले. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले. केवळ ९ वर्षांच्या काळात त्यांनी १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्‍या धर्मांध लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्‍यांमुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला होता. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली. छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।

यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।


आपल्या कारकीर्दीत छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय विषम अशा परिस्थितीस सातत्याने तोंड द्यावे लागले. अनुभवी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता, आणि तरुण, अननुभवी संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. शिवाय घरभेदी, फितूर लोकांच्या कारवाया होत्याच. पण या सर्व परिस्थितीतही छत्रपती संभाजी राजांनी मोगली सैन्याला दाद दिली नाही, औरंगजेबाला यश लाभले नाही. पण फितुरांमुळे संभाजीराजे शत्रुच्या ताब्यात सापडले. १६८९ मध्ये संभाजी राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संगमेश्र्वर येथे मुक्कामी थांबले होते. फितुरांकडून बातमी मिळाल्यानंतर मुखर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. औरंगाजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. तेथे त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला.गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते.गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. औरंगजेबाने या प्रसंगी क्रौर्याची परिसीमा गाठली. पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तनास होकार दिला नाही. धर्मासाठी, मुख्य म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी स्वत:चे बलिदान दिले..................................

त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,

पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.


"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."हे वर्णन केले आहे, 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणा-या ऍबे कँरे या फ्रेंच प्रवाशाने.

संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !

संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो.१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल', असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजेशेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.
शिवाजी आणि संभाजी हे आहेत महाराष्ट्र धर्माचे मूलमंत्र ।

जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।

महाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्‍या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्‍न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती.

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ग्रंथांची सूची :

१. छावा - शिवाजी सावंत - कॉन्टिनेन्टल

2. संभाजी - विश्र्वास पाटील - मेहता पब्लिशिंग

3. शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले - कॉन्टिनेन्टल प्रकाशन

४. छत्रपती संभाजी - वा. सी. बेंद्रे

५. मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण व. भोसले - नरसिंह पब्लिकेशन्स

६. शंभूराजे - प्रा. सु. ग. शेवडे - धर्मसेवा prakaashan

7. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - अरुण जाखडे - पद्मगंधा प्रकाशन